You are currently viewing राहुल, जोडणारे लोकच इतिहास निर्माण करीत असतात !

राहुल, जोडणारे लोकच इतिहास निर्माण करीत असतात !

प्रिय राहुल,
७ सप्टेंबर पासून तू भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघालास ! तुझ्यासोबत काही महिला-पुरुष साथीदारही निघाले.त्यांची संख्या किती आहे याला फारसे महत्त्व नाही. परंतु कन्याकुमारी ते काश्मीर तुझ्या खांद्याला खांदा लावून आणि तुझ्या पावलावर पाऊल टाकून तुझ्यासोबत साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करण्यासाठी मोठ्या हिमतीने आणि आशेने ते निघालेले आहेत. महात्मा गांधींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह सुरू केला तेव्हाही त्यांच्यासोबत मुठभरच लोक होते, परंतु नंतर ते आंदोलन देशव्यापी झाले व गांधीजी विश्वव्यापी झाले.आम्हाला गांधींसोबत तुझी तुलना अजिबातही करायची नाही.परंतु तुही शेवटी गांधींचाच मार्ग निवडला असल्यामुळे तुझ्याही भारत जोडो ला गांधीप्रमाणेच यश मिळेल असं आम्हाला वाटते.तुझ्याही नावात गांधी आहे.तुझ्यातही गांधी सारखी ऊर्जा आणि प्रामाणिकता आहे.तुझ्यातही काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची इच्छाशक्ती आहे.तुलाही धर्मांधता आणि विषमतेवर प्रहार करायचा आहे आणि एक एक माणूस जोडून या देशाला खऱ्या अर्थाने जगाच्या तुलनेत सन्मानाने उभे करायचे आहे.तू यशस्वी होशील किंवा नाही हा भाग नंतरचा आहे.परंतु तू दडपशाहीच्या विरोधात चालायला सुरुवात केलीस,मुक्या माणसांशी संवाद साधायला लागला व त्यांच्यात बिनधास्तपणे मिसळायला लागलास यातच तुझ्या भविष्यातील यशाचे गुपित लपलेले आहे.सत्ता येते आणि जाते, परंतु मिळालेल्या सत्तेचा उपयोग तुम्ही जोडण्यासाठी करता की तोडण्यासाठी यावर तुमच्या सत्तेचे मूल्यमापन होत असते.इतिहास नेहमी जोडणाऱ्यांची दखल घेत असतो.कधी कधी तोडणाऱ्याला जोडणाऱ्या पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते,जास्त यश मिळते, परंतु जनतेच्या हृदयात प्रेमाची आणि आपुलकीची जागा मात्र सदैव जोडणाऱ्यालाच मिळत असते.भगवान गौतम बुद्धांनी क्रूर अंगुलीमाल डाकूला जोडणारा होण्यासाठी प्रबोधन केले होते व त्या उपदेशामुळे त्याचे विचार परिवर्तन झाले होते.आजही या देशाला बुद्धाच्या त्याच जोडणाऱ्या विचारांची नितांत आवश्यकता आहे व तू त्याच मानवतावादी विचारांची कास धरुन घराच्या बाहेर पडलास म्हणून असंख्य लोकांच्या मनात एक अंधुकशी आशा निर्माण झाली आहे.

राहुल, सध्याच्या काळात दोन किलोमीटर पायी चालण्यासाठी सुद्धा माणसाची दमछाक होते.या काळात पायी चालणे जवळपास बंद झाल्यासारखे आहे.आमची ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी जनता सोडली तर पायी चालणे हा फक्त मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक एवढ्या पुरता एक सोपस्कार झालेला आहे.अशावेळी शहरी वातावरणात आणि सधन राजकीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेला तू साडेतीन हजार किलोमीटर चालण्याचा निर्धार करतो आणि इतरांनाही आपल्यासोबत चालण्यास प्रवृत्त करतो यातच तुझ्या वैचारीक,सामाजिक,राजकीय आणि देशभक्तीपर विचारांचे अस्सल प्रतिबिंब दिसून येते.राहुल, दररोज २०-२५ किलोमीटर चालणे सोपे तर नाहीच, पण एवढे अंतर चालण्याचा विचारही या काळात कोणी करु शकत नाही.तरीही तुझ्यावर काही विकृतांची टिकाटिपणी दररोज सुरुच आहे.तू कशाकरता चालत आहे यावर अनेक वादविवाद सुरू आहे,पुढेही सुरू राहतील.परंतु कित्येक वर्षानंतर एखादा तरुण राजकारणी या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी अनेक दिवस पायी चालण्याचा निर्धार करतो हीच एक आशादायक गोष्ट आहे.त्यात तुझा राजकीय स्वार्थ असेलही आणि तो असणे यात काहीही चुकीचे नाही.पण तो स्वार्थ साध्य करण्यासाठी संपूर्ण देश पायी चालण्याची हिंमत कोणत्या राजकीय नेत्यामधे आहे ?

राहुल, तुझ्या पक्षाच्या लोकांनीही भूतकाळात खूप चुका केलेल्या आहेत.म्हणूनच आज तुझ्यावर हजारो किलोमीटर पायी चालण्याची वेळ आलेली आहे.त्यामुळे भविष्यात अशा चुका टाळण्याची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे.राजकारण आज मूठभर धनदांड्यांचा खेळ झालेला आहे. सामान्य माणसाला सत्तेपर्यंत पोहोचण्याचे सर्व मार्ग जवळपास बंद झालेले आहेत.कोणतीही सामाजिक, शैक्षणिक,वैचारीक कुवत नसणारी माणसे केवळ बेईमानीने कमावलेल्या पैशाच्या बळावर सत्तेचा सारीपाट बळकावून बसलेली आहेत.अशावेळी तुझी पदयात्रा सामान्य माणसांच्या मनामध्ये आशेचा एक अंकुर निश्चितपणे पैदा करेल असे वाटायला लागले आहे.ज्या कोवळ्या पोराने आपल्या डोळ्यासमोर आपल्या आजीच्या छातीला भेदून जाणाऱ्या गोळ्यांचा भयावह आवाज ऐकला, ऐन तारुण्यात ज्याने आपल्या वडिलांच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झालेल्या पाहिल्या,तरीही ज्याने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केले,ज्याने आपल्या समजदारीच्या वयात आपल्या आईचे जाणूनबुजून विकृतपणे होणारे चारित्र्यहनन पाहिले, ती व्यक्ती कोणाविषयी सुध्दा आपल्या मनात कटूता,द्वेष,घृणा न बाळगता व कोणाविषयी एक अपशब्द सुध्दा न बोलता शांतपणे आपली वाट चालण्यासाठी गांधींच्या मार्गाने घराबाहेर पडते यातच तुझे उच्च संस्कार आणि संस्कृती दिसून येते.

प्रिय राहुल, तू सर्वांना माफ करून जोडण्याची भाषा करतो. याच गोष्टीची सध्या देशाला खूप गरज आहे.जेव्हा तोडणाऱ्यांचे प्रस्थ माजते आणि जोडणाऱ्या विचारांची माणसे भीतीपोटी चूप असतात तेव्हा तोडणाऱ्यांची हिम्मत आणखी वाढत जाते.अशावेळी स्वतःला सज्जन समजणारी माणसे अप्रत्यक्षपणे तोडणाऱ्यांच्या गटात सामील झाल्यासारखी वाटतात.जोडणारा मात्र कमी लोकांना घेऊन अल्प साधनसामुग्रीने,आकाराने मोठ्या दिसत असलेल्या तोडणाऱ्यांसोबत निडरपणे,नजरेला नजर भिडवून चालण्याची,बोलण्याची हिंमत करतो ; तेव्हा एक दिवस निश्चितपणे जोडणाऱ्याचा विजय होत असतो याची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात पहावयास मिळतात.त्यामुळे कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे असते.कोणीतरी स्वतःला मातीत गाळून घेण्याची तयारी ठेवावी लागत असते.तेव्हाच बहुतांश लोकांना सुखसमाधानाचे व समृध्दीचे पीक पाहायला मिळते.ती तयारी आणि पुढाकार तू घेतलास त्याबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे राहुल !

राहुल, पायी चालणारे लोक कधीही दुसऱ्यांना पायी तुडविण्याची भाषा करीत नाही.पायी चालणारे दुसऱ्यांना तुच्छ लेखत नाही.पायी चालणारे नेहमीच जमिनीवर चालणाऱ्या माणसांची कदर करतात कारण पायी चालणाऱ्यांचा संबंध मातीशी येतो.पायी चालणारे अंतर गाठतात व डोक्याने चालणारे ध्येय गाठतात असे बरेच विचारवंत सांगत असतात.परंतु माणसामाणसातील अंतर आणि दरी व दुरी कमी करण्यासाठी तू पायाने चालत आहेस.त्यामुळे तुझ्या ध्येयापर्यंत तू निश्चितच पोहचणार आहेस.भेकाडांच्या जगात जेव्हा एखादा निडर,मरणाला न घाबरणारा किंवा आपल्याला मरण येऊ शकते याची खात्री असूनही लढण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत रणभूमीवर दंड थोपटून उभा असतो, तेव्हा ती रणभूमी सुद्धा जोडणाऱ्यांच्याच बाजूने असते. त्यामुळे राहुल तू निघालास,चालायला लागलास,बोलायला लागलास, लोकांमध्ये रमायला लागलास, सामान्यांची सुखदुःख समजून घ्यायला त्यांच्या घरात जायला लागलास आणि देशाला जोडण्याची मोहीम आखून निधड्या छातीने घराबाहेर पडलास यातच नव्या भारताच्या उदयाची आणि विकासाची बिजे आहेत.

राहुल,आम्ही तुझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाही हे सांगतांना आम्हाला कुठेही संकोच वाटत नाही.आम्ही संभाजी ब्रिगेड नावाच्या बहुजनांना जोडणाऱ्या विचारधारेचे मागील ३० वर्षापासून वाहक आहोत.तुझ्या पक्षाच्या महाराष्ट्रातील लोकांनी जरी आमच्या समाजसेवी कार्याची अजूनपर्यंत कदर केलेली नसली तरी देशाला जोडण्याच्या तुझ्या उदात्त विचारांसोबत आम्ही सतत सोबत राहू. जो जोडणारा असतो तोच नवनिर्मिती करू शकतो.तोच मानवता आणि बंधूता निर्माण करू शकतो.तोच विश्वकल्याणाची संकल्पना जगात नांदवू शकतो.ज्या ज्या महापुरुषांनी जोडण्याची भाषा केली,त्यांनी लोकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजविले आहे.ते समाजसुधारक झाले, धर्म संस्थापक झाले, तत्ववेत्ते झाले आणि इतिहास निर्माण करून गेले.तूझ्याही पदयात्रेचा इतिहास एक दिवस नक्कीच लिहिला जाईल आणि जे जे लोक तुझ्या काही मतांशी असहमत असूनही देशाला जोडण्याच्या प्रक्रियेत तुझ्यासोबत सहभागी होतील ते सुद्धा इतिहासात अजरामर होतील.कारण देश धर्मांधतेच्या आगीत होरपळत असताना एका कथेतील त्या पक्षाप्रमाणे चोचीत पाणी घेवून आग विझविणारे लोक जेव्हा पुढे येतील ते निश्चितच आग विझविणाऱ्यांच्या यादीमध्ये सन्मानाने समाविष्ट होतील.तू किती मोठे काम करशील,किती माणसे जोडशील किंवा तुला किती यश प्राप्त होईल यापेक्षा तू जोडणाऱ्यांच्या दिंडीचा वारकरी झालास यातच तुझी महानता आणि महात्म्य सामावले आहे.खरोखर तू Great आहेस राहुल ! तुझ्या कार्याला,औदार्याला आणि शोर्याला मानाचा मुजरा ! I love u Rahul !!!

प्रेमकुमार बोके

अंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६
२४ आॕक्टोबर २०२२ (दिवाळी)

This Post Has One Comment

  1. अजित दयानंद शिंदे, उपाध्यक्ष युवक काँग्रेस ग्रा लातूर,

    भारत जोडो यात्रा ही देशातील वाढती बेरोजगारी,
    शेतकरी विरुद्ध धोरणे, देशातील वाढती महागाई,
    देशातील होत असलेले खाजगीकरण,
    आणि देशात चालत असलेले धार्मिक राजकारण,
    विरुद्ध चे विचार घेऊन निघालेला ही यात्रा आहे,
    भारत JODO YATRA ही आता संपूर्ण देशवासीयांची आहे
    मी या यात्रेमध्ये सहभागी आहे आपण ही सहभाग नोंदवावा,

Leave a Reply