॥१॥
सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय दमनकारी दडपशाहीच्या विरोधात व्यक्त होणे ही आजची गरज.मात्र उन्मत्त व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्यास किंवा अभिव्यक्त होण्यास बुद्धिजीवी वर्ग कच खातो आहे ही वस्तुस्थिती.
कारण दमनकारी व्यवस्थेचा वर्तन-व्यवहार.भारतीय प्रचार पार्टीच्या तंबूत तुम्ही असाल किंवा त्यांच्या सांस्कृतिक-राजकीय धोरणांचे पुरस्कर्ते असाल तरच सुरक्षित आहात व आपल्या फायदे मिळू शकतात हे अनुभवण्याचा व समजण्याचा असा हा काळ.
॥२॥
संवैधानिक मूल्ये,संवैधानिक संस्था,संसदीय लोकशाहीतील नीतिमत्ता वगैरे या अनुषंगाने राजकीय टीका-टीपण्णी करुन स्वतःला राजकीय भूमिकेत उघडे का करायचे? असा प्रश्न डोक्यात ठेवून स्वस्वार्थासाठी गप्प पडलेली माणसं अवतीभवती मोठी आहेत.
॥३॥
देशात आम्हांला संवैधानिक निष्ठा अबाधित ठेवणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता हवी असते.परंतु जिल्ह्यात लोकसभेचे प्रतिनिधीत्व मात्र स्व:जातीकडेच हवे असते.मग तो प्रतिनिधी भारतीय प्रचार पार्टीचा असला तरी हरकत नाही.समाजात असेही माणसे पाहतो की भारतीय प्रचार पार्टीच्या एकूण धोरणांवर सारखी तोंडसुख घेत असतात मात्र त्याच पार्टीतील आपल्या जातीच्या नेत्यांवर मात्र प्रचंड प्रेम करतात..व प्रत्यक्षात मते तिथे देतात.
॥४॥
तर एकूण असे….
दमनकारी सांस्कृतिक,राजकीय सत्तेच्या विरोधात दंड थोपटून एखादा नेता सहिष्णूपणे भारताच्या बहुसांस्कृतिक विविधतेला ‘राष्ट्रीय एकात्मते’च्या सलोख्याने जोडू पाहत असेल,उन्मादाला शांतीने,टीकेला सहनशीलतेने,अन्यायाला धीरोदात्तपणे सामोरा जावून ‘वाचा’ फोडत असेल
तर अशा काळात वैयक्तिक इच्छा,आकांक्षा बाजूला ठेवत पार्टीलाईनपलिकडे जात सर्वानीच ‘भारतजोडोचे’ समर्थन करायला हवे आहे.ती उद्याच्या ‘एकात्म भारताची’ गरज आहे.
प्रा. गणेश मोहिते, बीड