मित्रहो,
मी शरद बाविस्कर.
ह्या पोस्ट द्वारे मी आपल्याला भारत जोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी आवाहन करीत आहे.
तसं पाहिलं तर मी शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती असल्याने तटस्थता बाळगणं आणि सगळ्या गोष्टींविषयी चिकीत्सक असणं माझं कर्तव्य आहे.
मी अनेक ठिकाणी नमूद केलं आहे की माझ्यासाठी तटस्थ असणं म्हणजे उदासीन असणं नव्हे. मी परिस्थितीनुसार आणि माझ्या विवेकबुद्धीनुसार एक नागरिक म्हणून माझ्या राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडत असतो कारण तो माझा अधिकार आणि कर्तव्य देखील आहे.
राजकीय भूमिका मांडताना माझा एकमेव निकष असतो आणि तो म्हणजे लोकशाही मूल्यांचं रक्षण आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा विचार. जिथं democratizability ची शक्यता आणि जनकल्याणाचा विचार केला जातो तिथं मी ठामपणे समर्थन देत असतो. समर्थन देतो म्हणजे चिकित्सक बुद्धी त्यागत नसतो आणि कुणालाही चिकीत्सातीत सोडत नसतो.
आजच्या घडीला आपल्या समाजातील द्वंद्व प्रकर्षाने दिसून येत आहे. लोकशाहीसाठी झटणारे आणि लोकशाहीला नष्ट करू पाहणारे अशी विभागणी आपल्या समाजाची झालेली दिसते.
जे जे पक्ष आणि व्यक्ती लोकशाही मूल्यांसाठी प्रामाणिकपणे मैदानात उतरतील त्यांच्यासोबत आपण गेलं पाहिजे.
आजच्या घडीला लोकशाही मूल्यांसाठी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा निघाली आणि ह्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे!
आपण देखील ह्या ऐतिहासिक क्षणात सामील झालं पाहिजे आणि भारत जोडो यात्रेला समर्थन दिलं पाहिजे.