तुझी आजी या देशाची पंतप्रधान असताना
ती अंगरक्षकाच्या गोळीने मारली गेली
तुझ्या बापाला मारताना पुष्पगुच्छात ठेवला बॉम्ब रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
इंदिराजीचा मृतदेह
मी विसरू शकत नाही
कसं डोळ्याआड होतं तुला ते दृश्य ?
बॉम्बस्फोटातला राजीवजींचा छिन्नविछिन्न देह
आजही धरकाप उडवतो माझा
कसा कानाडोळा करतोस त्या कानठळ्या आणि शरीराच्या लगद्याकडे ?
केवढी उडविली टिंगल तुझ्या जन्मदात्या आईची किती हिणवलं तिला
परकीय “बाई ” म्हणून
कशी नेतोस सांभाळून मुलाची नैतिक जबाबदारी?
बहिणीच्या मागेही ठरलेला चौकशीचा ससेमीरा
कसं जमतं तुला व्हायला तिच्यासाठी सोहिरा…
तुला तर देशाने केव्हाच
पप्पू करून टाकलाय
कोणी मुठीत घेतलाय
कोणी झाकून ठेवलाय राजकारणातली अक्कल नाही म्हणतात लोक तुला शक्कल लढवता येत नाही म्हणून मागे राहिला
अरे जोडून कुठे
भारत जोडतो काय? वेड्यासारखे धरतोस म्हाताऱ्यांचे पाय
या देशात सत्ताधाऱ्यांचे
पाय धरायचे असतात
त्यांचे तळवे चाटायचे असतात
त्यांनी थुंकलं तर
तीर्थप्रसाद समजून
जिभेनं चाटणारे लंपट
इथे मोठे होतात
ए… माझ्या लाडक्या राजपुत्रा…
तू कोणत्या देशात राहतोस? जिथे मानवतेची मुल्ये
रस्तोरस्ती तुडवली
जात आहेत
रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह वाहत आहेत
खोबणीतले डोळे घेऊन खपाटीला पोटं गेलेले
म्हातारे – म्हाताऱ्या
तुझ्या ओढीनं
रस्त्यावर येत आहेत परिस्थितीने पडलेली डबरी मुजवता – मुजवता
मेथाकुटीला आलेले स्त्री-पुरुषांचे कित्येक पाय
ओढले जात आहेत तुझ्याकडे
खांद्यावर हात टाकून निघाला आहेस बिनधास्त उभारी देत तरुणाईला
अरे… गेल्या कित्येक वर्षात असं हसलं नव्हतं कुणी खळखळून… निर्व्याज… निर्मोही… स्वार्थाशिवाय
तुझ्या गालावरच्या खळीनं केवढी कमाल केली
माझ्या देशात
ए… गोंडस राजपुत्रा…!
मला आठवतो आहे बुद्ध युद्ध नको म्हणणारा
सारं ऐश्वर्य त्यागून
तूही तसाच
बाहेर पडला आहेस
माझ्या देशाच्या मातीत
शांती पेरायला
ए… अलवार राजकुमारा… पाऊल जरा जपून टाक मातीखाली आधीच
बॉम्ब पुरून ठेवले आहेत हवेत विषाणू सोडले आहेत बंदुकीची गोळी , बॉम्बस्फोट या पुढचं प्रगत तंत्रज्ञान अवगत करण्यात
अनेक डोकी अनेक हात गुंतले आहेत
ए… राजस सुकुमारा…
तुझ्या जगण्याच्या वाटेवर मारेकरी टपले आहेत
डॉ.स्वाती शिंदे-पवार, विटा. 980 963 99 99.