काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा दिनांक सात नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणार आहे. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील एका टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील मार्ग कार्यक्रम, वेळापत्रक याबाबतचा तपशील जाहीर करणारी पत्रकार परिषद नांदेड दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेच्या नांदेड मधील संपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी अशोकरावजी चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील पाच दिवसांच्या संपूर्ण कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांचा भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा दिवस व वेळ निश्चित झाली असून दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी शरदचंद्रजी पवार यांचे नांदेड येथे आगमन होणार आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता शरदचंद्रजी पवार नांदेड जिल्ह्यातील नायगाव या शहरात भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. या ठिकाणी ते राहुल गांधी यांच्यासोबत काही काळ चालतील. नंतर शरदचंद्रजी पवार आणि राहुल गांधी यांची बैठक व चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पण याच दिवशी भारत जोडो यात्रेमध्ये होणार आहेत, अशीही माहिती अशोकराव चव्हाण यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा भारत जोडो यात्रेमध्ये निमंत्रण स्वीकारलेले आहे. परंतु ते कोणत्या दिवशी व कुठे सहभागी होतील, याबाबतची दौरा निश्चिती सध्या झाली नाही, असेही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले. एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार, हे चित्र नांदेड मधील अशोकराव चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेने स्पष्ट केलेले आहे.
