तुला समजून घ्यावा लागेल
सगळा प्रदूषित अवकाश
तुला समजून घ्यावी लागेल
पायाखालची माती
जी बापूजिनी घेतली होती
नंतरच कळला त्यांना हा देश
ही माणसं, त्यांची दुःख, त्यांचे शतखंडित झालेले चेहरे
हिरावून घेतलेली हक्काची भूमी कोणीतरी
ही भूमी घडवलीय मुळात
कायम चालणाऱ्या लोकांनी
या कायम चालणाऱ्या
नाम-अनाम चेहऱ्यातला
तू एक
फक्त एक आहेस
हे फक्त विसरू नकोस
चालणे आठवले की
मला दिसते बापूजींची काठी
झपाझपा चालणारे पाय
या भूमीच्या दुःखाचा शोध घेणारे
महत्तम महात्मा गौतमासारखे
दिसतात मला
माझे ज्ञानोबा, नामा, कबीर
नामा, गोरा कुंभार ते
गाडगेबाबांचे पाय
मला दिसतो माझा
आकाशाएव्हढा तुकोबा
आकाशव्यापुन उरलेला
त्रिखंडाला वळसा घालून
मातीत मालवून जाणारा
हाती पुस्तक घेऊन
एकट्या वाटेवरून चालणारा
माझा महात्मा जोतिबा
कायम खुणावतो मला
सांगतो,
चालत रहा, बोलत रहा
न बोलणे हा मृत्यू असतो
न चालणे म्हणजे
सदेह वैकुंठाला जाणे
सांगतो मला माझा जोतिबा
पायाखालच्या पृथ्वीखाली ज्याने नवी पृथ्वी उभारली
स्वच्छ, निरंक,
माणुसकीने भारलेली
ज्याने झाडून काढली सगळी जळमटे
लावला एक दिवा
गावगावांच्या वेशिंवर
त्या गाडगेबाबाचा झाडू
मी विश्वातले
अजस्त्र शस्त्र समजतो रे !
तशी ही फार मोठी कहाणी आहे
तुला कळेल, न कळेल
पण तू चालतोय ना
म्हणून वाटते
हे कळेल तुला नक्कीच
दुसरा
तिसरा
दहावा
सातवा
शंभर सातशेवा
दिवस उजाडताना
आपली झाडे नासलीय
नासत चाललेय इथले
आदिम शुद्ध रक्त
ज्यावर कुठल्याही वंशवादाचा
नव्हता डाग
एक निशांत चंद्र उगवत होता
सगळ्यांच्या डोईवर
तू चालत रहा
लोक चालत रहातील
दिशा उजळतील
एक नवी पहाट
नवा सूर्य
नवे क्षितिज
उगवेलच
चालणाऱ्या श्वासातून
एक धपापणारा उर
दिसतोय मला
एक श्वास निरकंपणे
झाड होणारा
शुद्ध आदिम होणारा
- श्रीकांत देशमुख .