काँग्रेसचे खासदार आणि पूर्वाध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दिनांक ७ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ही पदयात्रा आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.
त्या निमित्ताने माध्यमे, समाज माध्यमे आणि विविध स्तरावरील संवाद या संदर्भात कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे तरुण नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एक तातडीची सभा पुण्यात बोलावली होती.
शुक्रवार दिनांक २१ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी युवक काँग्रेसचे उपक्रमशील सरचिटणीस आणि माझे सन्मित्र प्रथमेशा आबनावे यांनी मला या बैठकीसाठी बोलावले होते. मला काहीसा उशीर झाला; पण मी तेथे पोहोचलो आणि तेथील उपस्थिती पाहून मला खूप आनंद झाला. युवक क्रांती दल, दक्षिणायन, संभाजी ब्रिगेड आणि विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या संघटनांचे मुख्यतः तरुण प्रतिनिधी तिथे दिसत होते.
संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर, सुनीती र र, संदेश भंडारे, या खेरीज समाज माध्यम हाताळणारे अनेक तरुण प्रतिनिधी होते.
या पदयात्रेत चांगले फलक ठळक विषयांचे आणि वचनांचे असावेत अशी एक सूचना आली. माझ्याकडे गांधीजींच्या प्रेरणादायी विचारांचे मी स्वतः संपादित केलेले पुस्तक होते, ते मी सतेज पाटील यांना दिले.
गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे गांधीजींचे नातू राजमोहन गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली होती. नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे. डॉ. यशवंत मनोहर यांच्यासारखे विचारवंत आहेत.
या सगळ्यांचा भारत जोडो पदयात्रेशी संपर्क कसा होईल असा प्रयत्न केला पाहिजे, असे मी सुचवले.
महिला सक्षमीकरणासाठी आणि महिला सन्मानासाठी आयुष्यभर कार्यरत असलेल्या सीमा साखरे,रुपा बोधी- कुलकर्णी, अरुणा सबाने, यांच्याशी संपर्क साधून त्यांना या संवादात सहभागी केले पाहिजे.
गांधीजींच्या प्रेरणेने सामाजिक जीवनात सक्रिय झालेल्या बाबा आमटे यांच्या कुटुंबातील अनेक जण विदर्भात आहेत.
गांधीजींचे सहकारी असलेले ठाकूरदास बंग यांचे सुपुत्र डॉ.अभय बंग आणि राणी बंग,
या सगळ्यांशीच भारत जोडो पदयात्रा जोडली जाऊ शकते.
सुदैवाने पक्षाच्या परिघापलीकडे जाऊन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्हीही नेते भारत जोडो पदयात्रेच्या स्वागतासाठी जाणार आहेत, अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील या बैठकीत सतेज पाटील ज्या रीतीने शांतपणे तरुण मित्रांच्या सूचना ऐकत होते आणि त्याला प्रतिसाद देत होते, ती खूपच महत्वाची गोष्ट होती. कोल्हापूरसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये सतेज पाटील यांना काँग्रेस पक्षाचे काम वाढवताना, निवडणुकीचे राजकारण पुढे नेताना पुढे नेताना कशी कसरत करावी लागत असेल,याच्या अनेक बातम्या आपण त्या त्या वेळी वाचल्या,पाहिल्या आहेत. एक शांतपणे आणि नेटाने काम करणारा तरुण नेता ही त्यांची प्रतिमा मी गेली अनेक वर्ष पाहतो आहे. पुण्यातील बैठकीतही त्याचा अनुभव आला.
त्यानंतर ते पुढील दोन-तीन बैठकांना रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.
मी त्यांना माझ्या पुस्तकाची प्रत दिली, माझे काही मुद्दे सांगितले. नंतर तेथून बाहेर पडलो.
काँग्रेस पक्षाच्या आघाडीवर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्यासाठी जणू एक मंत्र दिला आहे आणि त्यामुळेच प्रथमेश आबनावे ,भाऊसाहेब गाजबे असे अनेक तरुण देते सतेज पाटील यांच्या या बैठकीत दिसत होते. महाराष्ट्रात जेव्हा ही भारत जोडो पदयात्रा येईल तेव्हा त्याचे निश्चित जोरदार स्वागत होईल आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील तरुण आणि काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते त्यात सहभागी होतील आणि विद्वेषाच्या राजकारणाविरुद्ध आवाज उठवतील यात शंका नाही!
या सर्व तरुण मित्रांना, भारत जोडो पदयात्रेसाठी उदंड उदंड शुभेच्छा!!
अरुण खोरे, पुणे. यांच्या फेसबुकवरुन साभार
(मंगळवार, दि.२५ ऑक्टोबर,२०२२).