You are currently viewing आपण जोडत जाऊ

आपण जोडत जाऊ

ते पसरवतील द्वेष
आपण प्रेम पेरत जाऊ
ते तोडतील माणसं
आपण जोडत जाऊ

तोडणे सोपे
जोडणे अवघड
हे ठाऊकच आहे
तुला आणि मलाही
चल मित्रा,
कर घाई
हे कठीण कामही
आपण करुन दाखवू
ते तोडतील माणसं
आपण जोडत जाऊ

ते भूलवतील माणसांना
खोट्या भूल थापा देऊन
फसवतील परिघाबाहेरच्यांना
आत घेण्याचे आमीष दाखवून
नाहीच कोणी परका
आपण सारे एक होऊ
ते तोडतील माणसं
आपण जोडत जाऊ

खोटं बोलून आशेला लावून
त्यांनी गड जिंकलेत
उरले सुरलेही
त्यांच्या गळाला लागलेत
शेवटची संधी आहे
सारे सारे पणाला लावू
बघ ना माणसांच्या चेहऱ्यावरचा विश्वास
एक दिवस आपणच जिंकून दाखवू्
ते तोडतील माणसं
आपण जोडत जाऊ..!
– मारोती कसाब

Leave a Reply